अमरावतीत 23 ऑक्टोबरपासून सैन्यभरती
बुलडाणा वगळता सर्व विदर्भासाठी अमरावतीत भरती
उमेदवारांसाठी एसटी बसेसची सोय
महापालिकेतर्फे पाणीपुरवठा व स्वच्छता
राठी विद्यालय प्रांगणात थांबण्याची व्यवस्था
न्यू आझाद गणेशमंडळातर्फे निवास व भोजनव्यवस्था

अमरावती, दि. २१ ऑक्टोबर
भारतीय सैन्य दलातर्फे सैन्यभरती प्रक्रियेला 23 ऑक्टोबरपासून येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे होणार आहे. ही प्रक्रिया 3 नोव्हेंबरपर्यंत चालेल. बुलडाणा वगळता नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी अमरावतीत भरतीप्रक्रिया होणार आहे. भरतीसाठी स्थानिक संस्थांनीही निवास व भोजनव्यवस्थेसाठी सहकार्य केले आहे.
मोठ्या संख्येने उमेदवार दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता सैन्यदलातर्फे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, तसेच शासनाच्या सर्व विभागांच्या समन्वयातून भरतीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. भरतीसाठी आवश्यक मनुष्यबळ व साधने , सुसज्ज मैदान, सुव्यवस्थेसाठी बॅरिकेडस्, पेयजल व्यवस्था, स्वच्छतागृहे, सुरळीत वीज पुरवठा, अधिकारी/कर्मचारी निवास व्यवस्था आदी व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती दलाचे कर्नल आर.एम. नेगी यांनी दिली. आज दलातर्फे तयारीचा आढावाही घेण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, कॅप्टन ठकसेन पठारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.उमेदवारांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र दिवस देण्यात आले आहेत. उमेदवारांना मैदानावर पोहोचण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे पाणी पुरवठा व स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यात येत आहे.

रात्री 10 वाजतापासून सुरुवात

भरतीसाठी युवक रोज सायंकाळपर्यंत शहरात दाखल होतील. भरती प्रक्रियेचा प्रारंभ रात्री 10 वाजतापासून होईल. शारिरीक मोजमाप, धावणे वगैरे प्रक्रिया सकाळी 6 वाजतापर्यंत चालेल. त्यामूळे भरतीसाठी येणा-या मुलांनी रात्रीचे भोजन व पाणी स्वत: सोबत आणावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

उमेदवारांना रात्री थांबावयाचे झाल्यास राठी विद्यालयाच्या प्रांगणात थांबण्याची सोय आहे. इर्विन चौकाजवळील न्यू आझाद गणेश मंडळाच्या दिनेश बूब यांनीही व्यवस्थेसाठी सहकार्य केले आहे. मंडळाच्या मंडपात उमेदवारांची रात्री वास्तव्याची सोय आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील युवकांसाठी त्यांनी दि. 29 ऑक्टोबर व 31 ऑक्टोबर रोजी नाममात्र दरात भोजनाची व्यवस्था केली आहे. गरजू उमेदवारांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच अन्य्‍ा समाजसेवी संस्था/ मंडळांनीही यात योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

दक्षता घेण्याचे आवाहन

भरतीसाठी येणा-या युवकांनी स्वत: ची प्रमाणपत्रे सांभाळावीत. तसेच अनवाणी न धावता स्पोर्टस शूज घालूनच यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. भरतीकरिता उमेदवारांना जी तारीख दिली आहे, त्या दिवशी पहाटे 1 वाजेपासून प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे युवकांनी नियोजित दिनांकाच्या 1 दिवस आधी उपस्थित व्हावे. ही बाब उमेदवारांनी प्रकर्षाने लक्षात घ्यावी, दिनांकाचा घोळ होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन श्री. चरडे यांनी केले.

उमेदवारांनी अफवेला बळी पडू नये

सैन्यभरतीसाठी ऑनलाईन नोंदणीसह (ऑनलाईन ॲप्लिकेशन कम रजिस्ट्रेशन)अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. अत्यंत काटेकोर व पारदर्शीपणे हीप्रक्रिया पार पडते. तथापि, काही समाजकंटकांकडून उमेदवारांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन श्री. नेगी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.