मोर्शी तालुक्यातील डोंगर यावली घोडदेव परिसरात वाघाच्या अफवेमुळे दहशत !

शेकडो शेतकरी मजूर काम सोडून घरी परतले !
दहशतीमुळे शेतातील कामे ठप्प !

दि – २ मोर्शी प्रतिनिधी रुपेश वाळके

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोर्शी तालुक्यात घोडदेव डोंगर यावली परीसरात वाघाची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना शेतीमध्ये कामे करणे कठीण झाले आहे. आज दिनांक २ नोव्हेंबर रोजी ११ वाजताच्या सुमारास डोंगरयावली परिसरामध्ये स्वप्नील ठोके यांच्या शेतात वाघाने बैलावर हल्ला करून बैल जखमी केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिसरातील शेतातील सर्व शेतकरी व शेकडो शेतमजूर भीतीपोटी शेतातील सर्व कामे सोडून आपली जनावरे घेऊन जीव मुठीत घेऊन गावाच्या दिशेने पळत निघाले , तेव्हा रुपेश वाळके यांनी मध्य प्रदेश व महाराष्ट्र येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली त्यावेळी वनविभाग शोधमोहिमेवर निघाला तेव्हा तो हल्ला वाघाचा नसून शेतामध्ये वखर सुरू होता शेतकरी जेवण करायला गेला असता बैल शेतामध्ये कशाला तरी बुजाडल्यामुळे बैल वखर घेऊन सुसाट पळाले त्यामुळे बैलाला वखराची पास लागून बैलाचा पाय जखमी झाला असल्याचे समोर आले आणि परिसरात वाघ आल्याची अफवा ती अफवाच ठरली .

यावेळी महाराष्ट्र येथील वन विभागाचे कर्मचारी व्ही एफ मोरे , एन आर धुरे , व मध्य प्रदेश येथील वन विभागाचे अधिकारी रामदयाल पाटणकर , वनरक्षक सूर्यकांत त्रिपाठी , खंडागडे, यांच्यासह रुपेश वाळके , शशांक अमदरे , अमोल गुडधे व पोलीस पाटील , यांनी घटनास्थळी दाखल होताच संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. परिसरामध्ये वाघ आला आहे एवढेच लोकांकडून ऐकायला मिळत होते. याची शहानिशा होत नव्हती , ज्या परिसरात वाघ दिसल्याचे सांगितले गेले, त्या परिसरात सर्वत्र शोध मोहिम राबविली. शोध मोहिमेनंतर डुकरांच्या व कुत्र्यांच्या पाऊल खुणा आढळल्या मात्र वाघाच्या पाऊलखुणा कुठेच आढळल्या नसल्यामुळे वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, वाघ बघायला आलेल्या नागरिकांची निराशा झाली.
परिसरामध्ये शोध घेतला असता दोन ते अडीच तासांच्या शोध मोहीमेनंतर ही घटना केवळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर पहायला गेलेले नागरिक व वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी परत आले. या अफवेमुळे डोंगर यावली , घोडदेव , सलबर्डी , दापोरी , परिसरातील शेतकरी शेतमजूर यांच्यामध्ये वाघाची चांगलीच दहशत कायम आहे.
अफवा पसरवू नये, वनविभागाचे आवाहन !
कुणी काहीही सांगितले तरी वाघाच्या बाबतीत लोकांचा विश्वास बसत आहे. अशा अफवा पसरवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
शेतकऱ्यांमध्ये वाघ व चोरट्यांच्या भीतीचे वातावरण !
या प्रकारामुळे लांडगा आला रे आला ही गत होवून आणि प्रत्यक्ष वाघ दिसला तरी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये कारण या भीतीमुळे शेतातील मोटार पंप , केबल ,व शेतीतील इतर मौल्यवान साहित्य, संत्रा , कापूस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या अफवेचा फायदा घेऊन चोरटे सुद्धा आपली दिवाळी साजरी करू शकतात अशी शंका सुद्धा शेतकऱ्यांना येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.