शाळा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
• संस्थाचालकांची जिल्हाकचेरीवर धडक
दि २ – अमरावती
राज्यातील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा डबघाईस आल्या असून शासनाचे चुकीचे धोरण त्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या नेतृत्वात राज्यभरातील मराठी शाळा बंद ठेवण्याच्या आवाहनाला जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांनी आज जिल्हाकचेरीवर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
परीक्षांसाठी इमारत देणार नाही
राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी या आंदोलनात ताकदीने उडी घेतली असून अमरावती जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांनी देखील यात सहभागी होत आज शाळा बंद ठेऊन आंदोलन यशस्वी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवाजी शिक्षण संस्था देखील सहभागी होती. या आंदोलनानंतर शासनाने ३० दिवसांच्या आत संस्थांच्या मागण्या पूर्ण न केल्यास यंदाच्या शैक्षणिक सत्रात होणाऱ्या शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांना शाळेच्या इमारती उपलब्ध करून देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला आहे. या आंदोलनात मुख्याध्यापक संघ तसेच शिक्षक आणि इतर शिक्षण संबंधित सर्वच संघटनांनी सहकार्य केले आहे.
अशा आहेत मागण्या
जिल्हाधिकाऱ्यांना आज संस्थाचालकांनी आपल्या १५ विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात पवित्र पोर्टलद्वारे कर्मचारी भरती रद्द करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची परवानगी देण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनेतर अनुदान देण्यात यावे, रेडीरेकनरच्या दरानुसार शाळांचे भाडे देण्यात यावे, शिक्षण करातून केवळ शिक्षणावरच खर्च करण्यात यावा, शिक्षण संस्थांना मालमत्ता कर व वीज बिलातून सूट देण्यात यावी, शालेय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, २० टक्के अनुदानित शाळांना पूर्ण अनुदान द्यावे, आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांची थकित रकमेची प्रतीपूर्ती त्वरीत अदा करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष कांचनमाला गावंडे, सचिव डॉ. मेघश्याम करडे, रामकृष्ण कळसकर, मधुकर अभ्यंकर, अॅड. दीपक तारे, मोहन पावडे, विश्वनाथ सदाशिवे, श्रीपाद तारे, रमाकांत शेरकार, प्रा.सुभाष धोटे, दीपक खेरडे, किशोर बोरकर, एस.एस. मोहोड आदींसह अनेक संस्थाचालक उपस्थित होते.
जिल्हाभरातील ५०० शाळांचा आंदोलनात सहभाग आज पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनात जिल्हाभरातील तब्बल ५०० शाळांनी आंदोलनात सहभागी होत शाळा बंद ठेवल्या होत्या. शिक्षण संस्था चालकांच्या मागण्या पूर्णपणे कायदेशीर आहेत. शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.