अमरावती जिल्ह्यात मीझल्स रुबेला लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ

अमरावती जिल्ह्यात मीझल्स रुबेला लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ
अमरावती, दि. 27 नोव्हेंबर
नवी पिढी सुदृढ व सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचे मोठे योगदान आहे. येणा-या पिढीच्या भवितव्यासाठी पालक व समाजातील सर्व घटकांनी सहकार्य देऊन मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आज येथे केले.
गोवर आणि रुबेला या आजारांच्या समूळ उच्चाटनासाठी लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ येथील अरूणोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंतराव देशमुख, उपमहापौर संध्याताई टिकले, अरुणोदय संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंतराव लुंगे, डॉ. सोनाली शिरभाते, प्रशांत डवरे, रिताताई मोकमकार, नीलिमा काळे, महापालिका आयुक्त संजय निपाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठमके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, डॉ. पद्माकर सोमवंशी आदी उपस्थित होते.
प्रारंभी लसीकरण कक्षाचे उद्घाटन व लसीकरणाचा कार्यक्रम झाला. या मोहिमेत समाजातील विविध घटकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन श्रीमती टिकले यांनी केले. लसीकरणाची आवश्यकता ओळखून पालकांनी मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. लुंगे यांनी केले. देवी व त्यानंतर पोलिओ या रोगांच्या समूळ उच्चाटनानंतर आणि आता गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा महायज्ञ सुरु करण्यात आला आहे. या नव्या पिढीसाठीच्या या पवित्र कार्यात सर्वांनी योगदान द्यावे, असे डॉ. निकम म्हणाले.गोवर-रुबेलाची लस गेल्या 40 वर्षांपासून जगातील 149 देशांमध्ये यशस्वीपणे वापरली जात आहे. राज्यात सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी एएनएम, आशा व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये व त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्यसंपर्क लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे, असे डॉ.आसोले यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील बालके या लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून अंगणवाडी सेविकांकडे प्रत्येक बालकाची नोंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांची देखील नोंद ठेवण्यात आली आहे. बालरोगतज्ज्ञांची संघटना, अखिल भारतीय वैद्यकीय संघटना (आय एम ए) यांची देखील मदत घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. लसीकरण झालेल्या बालकांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम, डॉ. घोडाम, डॉ. रेवती साबळे, जागतिक आरोग्य संघटनेचे अमेय धात्रक, डॉ. मानसी मुरके, पल्लवी आगरकर यांच्यासह पालक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या