श्री अंबादेवी संस्थानचा संगीत सेवा समारोह, दिग्गज शास्त्रीय गायकांची राहणार उपस्थिती

श्री अंबादेवी संस्थानचा संगीत सेवा समारोह, दिग्गज शास्त्रीय गायकांची राहणार उपस्थिती

 

अमरावती, २७ नोव्हेंबर,

अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री अंबादेवी संगीत सेवा समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनाचे हे १४ वे वर्ष असून याहीवर्षी प्रसिद्ध शास्त्रीय गायक या समारोहाला आपली हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

श्री अंबादेवी संस्थान प्रामुख्याने संगीत, विद्यार्जन, धार्मिक व रुग्ण सेवा समाजासाठी सातत्याने राबवित आहे. आपली संस्कृती, लोककला व लोप पावत असलेला प्राचीन भारतीय संगीत वारसा जतन करण्याच्या हेतूने श्री अंबादेवी संस्थांच्यावतीने दरवर्षी संगीत सेवा समारोहाचे आयोजन श्री अंबादेवी कीर्तन सभागृह येथे करण्यात येते. यंदा कार्यक्रमाचे हे १४ वे वर्ष असून प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने या समारोहाची सुरुवात होणार आहे. याशिवाय ३ दिवस चालणाऱ्या समारोहात धनंजय जोशी, कोलकाता येथील सहाना बॅनर्जी, पं. रमाकांत गायकवाड, पं. सुखदेवजी चतुर्वेदी, पं. सत्यशील देशपांडे हे नामांकित शास्त्रीय गायक आपली संगीत सेवा देणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन ३० नोव्हेंबर रोजी कांचन गडकरी व विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांच्या हस्ते होणार असून २ डिसेंबरपर्यंत हा समारोह चालणार आहे. सर्व रसिक श्रोत्यांनी या संगीत सेवा समारोहाचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. अतुल आळशी यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या