चांदूर रेल्वे एसटी महामंडळाकडुन प्रवाशांची लुट

चांदूर रेल्वे एसटी महामंडळाकडुन प्रवाशांची लुट
एकाच दिवसात टिकीटचे दर वाढविले दुप्पटीने
अमरावती दि 25 डिसेंबर
एसटी महामंडळाची टिकीट भाडेवाढ म्हटली की थोड्या थोड्या अंतराने वाढत जाते. परंतु अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे एसटी आगाराचा अजब – गजब कारभार पाहुन अनेकांना आश्चर्य नक्कीच होणार. कारण उड्डाणपुलाच्या कामामुळे केवळ ३ किलोमीटरचा फेरा वाढल्याने एसटी महामंडळाकडुन चक्क दुप्पटीने तिकीट वाढ झाल्याने महामंडळाने एकप्रकारे खाजकी गाड्यांना प्रवासी न्यायची सुट दिल्याचे दिसत आहे.
प्रत्येक खेड्यागावापर्यंत एसटी महामंडळाची लालपरी पोहचत असुन विद्यार्थ्यांना, अपंग, वृध्दांना विशेष सवलत दिली जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिक बसने एका गावातुन दुसऱ्या गावात सहजतेने पोहचत आहे. काही दिवसांपुर्वी डिसेलच्या किंमतीत वाढ झाल्याने एसटीच्या तिकीट दरात सुध्दा वृध्दी झाली होती. अशातच चांदूर रेल्वे शहरात काही दिवसांपासुन रेल्वे रूळावरून उड्डानपुलाचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे मुख्य मार्गावरून वाहतुक बंद असुन तीन किलोमीटर फेऱ्याने एसटी बसला आगारामध्ये यावे लागते. केवळ तीन किलोमीटरचा फेरा वाढल्यानंतर एसटी महामंडळाने काही प्रमाणात तिकीटमध्ये वाढ करायला हवी होती. परंतु असे न करता थेट दुप्पटीच्या जवळपास टिकीट रकमेत एसटी महामंडळाने वाढ केल्याने याचा फटका मात्र विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. प्रशासनाने दीडपटीने तिकिट दरात वाढ केल्याची सुचना एसटी आगारात लावली असुन ही वाढ दीडपटीपेक्षाही मोठी आहे. कारण घुईखेड ते चांदूर रेल्वे दरम्यान २० किलोमीटरचे अंतर असुन रविवारपर्यंत २५ रूपये प्रतिव्यक्ती तिकीट दर होते. मात्र उड्डानपुलामुळे केवळ तीन किलोमीटरचा फेरा वाढल्यानंतर सोमवारी तिकीटचे दर २५ वरून थेट ४५ रूपये करण्यात आल्याने अनेक प्रवाशांना धक्काच बसला. म्हणजेच तब्बल २० रूपयांची वाढ एकसोबत झाल्याने आता घुईखेड ते चांदूर रेल्वे च्या २३ किलोमीटरच्या प्रवासासाठी ४५ रूपये मोजावे लागत असल्याने अनेक प्रवासी बसचा प्रवास टाळतांना दिसुन आले. यावरून एसटी महामंडळाने खाजगी वाहतुक करणाऱ्यांना प्रवासी न्यायची एकप्रकारे सुटच दिल्याचे दिसत आहे.
यामध्ये अजुन आश्चर्याची बाब म्हणजे एसटी आगाराच्या तीन किलोमीटर पहिले उड्डानपुलाच्या कामाजवळ उतरले तर २५ रूपये प्रवाशांना द्यावे लागत असुन ३ किलोमीटर नंतर आगारात उतरल्यास ४५ रूपये द्यावे लागत आहे. त्यामुळे ही दरवाढ नेमक्या कोणत्या नियमाने केली याचा ही शोध लावने गरजेचे झाले आहे. यामुळे तिकीट दर कमी करून प्रवाशांची होणारी लुट तत्काळ थांबवावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा चांदूर रेल्वे येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विभाग नियंत्रकांना पाठविलेल्या निवेदनातुन दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.