दहावीचे टेन्शन कशाला?; पुण्यातील तज्ज्ञ शिक्षकांचे अमरावतीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; सीमा सावळे यांचे आयोजन

दि. ०८ अमरावती/प्रतिनिधी –

दहावीच्या परिक्षेत जास्तीत जास्त गुण कसे मिळवावेत, त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, अवघड वाटणारे गणित, इंग्रजी आणि विज्ञान पेपर कसा सोडवावा, याविषयी पुण्यातील तज्ज्ञ शिक्षकांनी अमरावतीतील विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

जिजाई प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांच्या वतीने शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमरावती महापालिका स्थायी समिती सभापती विवेक कलोती, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयंत डेहणकर, शिळण मंडळ समिती सभापती पद्मजा कौंडण्या, नगरसेविका सुचिता धिरे, गंगा आंभोरे, रिटा मोपलकर, स्वाती कुलकर्णी, सुरेखा लुंगारे, अनिता राज, रेखा भुतडा, नगरसवेक अजय पारसकर, संजय काणेरकर, महिला आघाडीच्या भारती डेहणकर, लता देशमुख, पिंपरी-चिंचवड शहर भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यासह सर्व शाळांमधील दहावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षक दिगंबर ढोकळे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन केले. इंग्रजीचा पेपर सोडविताना कोणती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून जास्तीत जास्त गुण मिळू शकतील, याबाबतही त्यांनी अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान विषयावरही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक संतोष पाचपुते यांनी गणित आणि भूमिती या विषयांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दोन्ही विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण कशा पद्धतीने मिळू शकतात, या विषयी सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच प्रमय, आकृत्या संदर्भात माहिती देऊन त्यांनी गणित आणि भूमिती विषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. सुरुवातीपासून अभ्यास कसा करावा, पेपर किती आणि कसे सोडवावेत, वेळापत्रक किती महत्वाचे आहे, हॉटसच्या प्रश्नांचा सराव कसा करावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना मिळाली.

फक्त पालक किंवा शिक्षकांनी सांगितले म्हणून अभ्यास करू नका. स्वतःच स्वतःला अभ्यासाची शिस्त लावून घ्या. आपल्या भविष्यासाठी अभ्यास करा. त्याबद्दलची भीती मनातून काढून टाका. अभ्यासक्रम मोठा आहे, तो कसा पूर्ण होणार, अशी भीती मनातून काढून टाका. कोणताही टॉपिक ऑप्शनला टाकू नका. परीक्षेत ९५ टक्के प्रश्न हे तुमच्या क्रमिक पाठ्यपुस्तकातीलच असतात. त्यामुळे सगळ्यात आधी ते नीट वाचा. दहावीत तुम्हाला १० ते १२ च धडे असतात. त्यामुळे त्याचे छोटे छोटे भाग करा. ते नीट वाचा. समजून घ्या. घोकमपट्टी केलीत तर उपयोग नाही. समजून घेतले, तर अनेक प्रश्नांची उत्तरे तुमची तुम्हालाच सापडतील. स्वतःची प्रश्नपत्रिका तयार करा आणि त्यांची मुद्देसूद उत्तरे लिहिण्याचा सराव करा. मुख्य परीक्षेत दिलेल्या सूचनांचे पालन करा.

मुद्देसूद उत्तरे लिहा. उगाच फापटपसारा नको. अभ्यासाची तुमची अशी एक पद्धत बनवा. रोज दिवसभर अभ्यास करणे सक्तीचे नाही. दिवसातील काहीच तास अभ्यास करा, मात्र तो मन लावून करा. प्रत्येक विषयाला रोजचा किमान दोन तास तरी वेळ द्या. एकाच वेळी एकाच विषयावर फोकस करा. अभ्यास करताना विषयाची वर्गवारी करा. गणित आणि विज्ञान हे विषय एकमेकांशी संबधित असल्याने त्यांचा अभ्यास एकत्र करा, असा सल्ला तज्ज्ञ शिक्षकांनी दिला. विद्यार्थ्यांनी परिक्षेविषयी असलेल्या शंका तसेच प्रश्न उपस्थित केले. त्यावर शिक्षकांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.