सवर्ण आरक्षण सर्व समाज घटकांना न्याय देणारा निर्णय : शिवराय कुळकर्णी

दि. ०८ अमरावती/प्रतिनिधी –

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. खऱ्या अर्थाने सर्व समाजघटकांना न्याय देण्याच्या या निर्णयाचे प्रदेश भाजपाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आज येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या खुल्या प्रवर्गातील सवर्णांना आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही वर्षांत समोर आली होती. समाजातील मागास घटकांना न्याय मिळत असताना सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांवर अन्याय होत असल्याची भावना मोठ्या समाजात जोर धरत होती. त्यातून सामाजिक विद्वेष वाढवणारी काही प्रकरणे समोर येत होती. समग्र समाज एकसंध ठेवण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले जाणे महत्वाचे होते. केंद्रातील भाजपा सरकारने काल हा ऐतिहासिक निर्णय करून फोफावत चाललेली सामाजिक तेढ दूर करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत डेहणकर, किरण पातूरकर, शहर सरचिटणीसद्वय अनिल आसलकर व सतीश करेसिया, महिला आघाडी अध्यक्ष रिताताई मोकळकर, सरचिटणीस लताताई देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवराय कुळकर्णी पुढे म्हणाले, विशेष म्हणजे आजवर दिल्या जात असलेल्या नियमित टक्केवारीला धक्का न लावता हे अतिरिक्त दहा टक्के आरक्षण सवर्णांना दिले जाणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला किंवा तत्वाला हात न लावता एका सामाजिक घटकाला न्याय देण्यासाठी नव्याने तरतूद तेवढी केली जाणार आहे. वर्षानुवर्षं शोषित व वंचित घटकांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, उर्वरित सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना देखील न्याय देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय सामाजिक मानसिकता परिवर्तनाच्या दिशेने देखील महत्वाचा निर्णय आहे. देशहितासाठी आणि समाज स्वास्थ्य सुदृढ करण्याच्या दिशेने देखील हा निर्णय महत्वपूर्ण असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.