पर्यायी घरे दिल्याशिवाय रस्ता रुंदीकरण नाही : शिवराय कुळकर्णी

पर्यायी घरे दिल्याशिवाय रस्ता रुंदीकरण नाही : शिवराय कुळकर्णी
मंदिराला धक्का न लावण्याचा इशारा
दि १० अमरावती
अमरावती – बडनेरा रस्ता रुंद करताना बडनेरा जुनीवस्ती कंपासपुरा स्थित शतकाहून जुने सजनाजीबुवा यांच्या हनुमान मंदिराला धक्का लावण्यात येऊ नये आणि रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या दीडशे घरांना पर्यायी निवासाची जागा दिल्या शिवाय रस्ता रुंद करू नये अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
अमरावती – बडनेरा मार्गाचे सध्या चार पदरीकरण सुरू आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाला आमचा विरोध नाही. उलट हे कार्य अधिक वेगाने व्हावे. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुमारे दीडशे लोकांच्या घरावरून बुलडोझर फिरवला जाणार आहे. या गरीब लोकांच्या घरांवरून बुलडोझर फिरवण्यापूर्वी त्यांना पर्यायी घराची जागा देण्यात आली पाहिजे. योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात आला पाहिजे. नंतरच त्या घरांना हटवण्याचा विचार करण्यात यावा, असे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट शब्दात संबंधित यंत्रणांना बजावले आहे.
आज शिवराय कुळकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱयांसोबत अतिक्रमण हटावच्या नोटिसेस देण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली. रुंदीकरण ग्रस्त लोकांसोबत चर्चा केली. यावेळी भाजपाच्या नगरसेविका गंगाताई अंभोरे, दलित मित्र उत्तमराव भैसने, श्रीधर करांडे, बाळू ठवकर, देवानंद भेरडे, सुरेश दातेराव, रवी वानखडे, योगेश निमकर, मनोज भेरडे, प्रवीण अतकारे, सुनील मोहतुरे यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख लोक उपस्थित होते. रस्ता रुंदीकरणामध्ये जुनीवस्तीतील कंपासपुरा स्थित सजनाजीबुवा हनुमान मंदिराचा काही भाग देखील जाणार आहे. हे जुने मंदिर असून संपूर्ण जुनीवस्तीची या मंदिरावर नितांत श्रद्धा आहे. मार्गाच्या पुढल्या भागात शासकीय जागा उपलब्ध असताना मंदिराची जागा वापरण्यात येऊ नये. कोणाच्या दबावात मंदिराची जागा ताब्यात घेण्याचे षडयंत्र असल्यास आम्ही ते हाणून पाडू, असा इशाराही शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे. शिवाय रस्ता रुंदीकरणासाठी नोटीसेस देण्यात आलेल्या दीडशे कुटुंबांना त्यांच्या घरांसाठी पर्यायी जागा देण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर बांधून देण्यात यावे. या साठी आवश्यक त्या शासकीय खात्यांनी एकत्रित बैठक घेऊन गरीब लोकांच्या पर्यायी घरांचा विषय निकाली काढल्यावरच रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती मनपा आणि संबंधित विभागांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.