आपण वापरत असलेल्या मिठामध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण

आपण वापरत असलेल्या मिठामध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण

दि 4 मुंबई

देशातील अनेक राज्यांमध्ये प्लॅस्टिकवर बंदी घातली गेली. लोकांनी प्लॅस्टिकच्या वस्तू विशेषतः पिशव्या वापरणे बंद केले, पण प्लॅस्टिकने अद्याप आपली पाठ सोडलेली नाही. ते सूक्ष्मरूपात आजही आपल्या जेवणातून पोटात जात आहे. आपण वापरत असलेल्या मिठामध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण शास्त्रज्ञांना आढळले आहेत.

आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संशोधन आहे. देशामध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतांश मिठामध्ये ‘मायक्रोप्लॅस्टिक’ म्हणजे प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण असल्याचे त्यांना आढळले. समुद्राच्या पाण्यात वाहून गेलेल्या प्लॅस्टिक कचऱ्यातून हे कण मिठामध्ये गेल्याचा त्यांचा निष्कर्ष आहे. मिठाचे उत्पादन करताना हे प्लॅस्टिक त्यात गेलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयआयटी मुंबईतील सेंटर ऑफ एन्व्हायरनमेंटल सायन्स ऍण्ड इंजिनीअरिंग विभागातील शास्त्रज्ञांच्या दोन पथकाने हे संशोधन केले. त्यांना विविध कंपन्यांच्या मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे 626 सूक्ष्म कण आढळले. त्यात 63 टक्के प्लॅस्टिकचे कण होते, तर 37 टक्के प्लॅस्टिकचे तंतू होते.  जगात मीठ उत्पादनामध्ये चीन आणि अमेरिकेनंतर हिंदुस्थानचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे आयआयटी मुंबईने केलेल्या या संशोधनाला फार महत्त्व आहे.

मिठाचे नमुने कसे निवडले?

या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी जून आणि सप्टेंबर 2017 मध्ये मिठाचे नमुने घेतले होते. स्थानिक बाजार आणि सुपरमार्केटसमधून आठ विविध मीठ उत्पादक कंपन्यांच्या मिठाचे हे नमुने होत. या मिठाचे उत्पादन 2016 आणि 2017 दरम्यान झाले होते. देशात सर्वाधिक 77 टक्के मिठाचे उत्पादन करणाऱ्या सहा ब्रॅण्डसच्या मिठाचा त्यात समावेश होता.

दरवर्षी प्रत्येक हिंदुस्थानीच्या पोटात जातेयप्लॅस्टिक

प्लॅस्टिकचे कण हे पर्यावरणात सर्वत्र पसरलेले आहेत. आता त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याचे गणित मांडण्याची गरज शास्त्र्ाज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक नागरिकाला रोज 5 ग्रॅम मीठ खायला हवे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या प्रमाणानुसार विचार केला तर हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाच्या पोटात दरवर्षी 0.117 मिलिग्रॅम प्लॅस्टिक मिठातून जात आहे. अन्य खाद्यपदार्थ आणि हवेमध्येही प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण असल्याचे संशोधनात आढळले आहे.

जगभरातील मीठ प्लॅस्टिकयुक्त

जगातील अन्य देशांमधील मिठावरही अशा प्रकारचे संशोधन झाले आहे. गेल्या चार वर्षांत झालेल्या संशोधनांमध्ये चीन, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, तुर्की, फ्रान्स आदी देशांमधील मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आणि तंतू आढळले आहेत. आयआयटी मुंबईच्या संशोधनानंतर या देशांमध्ये हिंदुस्थानचाही समावेश झाला. हिंदुस्थानातील मिठाच्या नमुन्यांमध्ये आढळलेले प्लॅस्टिकचे कण हे स्पेन, तुर्कीमध्ये मिठात आढळलेल्या प्लॅस्टिक कणांप्रमाणेच साम्य असलेले आहेत.

80 टक्के नमुन्यांमध्ये प्लॅस्टिक

प्रयोगशाळेत 80 टक्के नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे कण आणि तंतू आढळले. प्लॅस्टिकच्या कणांचा आकार 0.5 मिलिमीटर तर तंतूंचा आकार 2 मिलिमीटर इतका होता. अगदी 5 मिलिमीटर आकाराचे तंतूही या संशोधनात आढळले. परंतु त्यांची संख्या कमी होती, असे संशोधन अहवालात नमूद करण्यात आले. पॉलिथिलीन टेरेप्थॅलेट आणि पॉलिस्टर हे घटक या मिठामध्ये आढळले. पोलिथिलीन टेरेप्थॅलेट हे प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि डबे बनविण्यासाठी वापरले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.